१०० नगरसेवक निवडून आणून पालिकेवर पुन्हा आपलाच झेंडा फडकवायचा निर्धार – भाजपाचा अभार मेळावा

0
36

पिंपरी : टाॅप ब्रेकिंग न्यूज

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पराभूत होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांचे आभार मेळावा घेऊन नुकतेच (ता.९) मानले. त्यानंतर विजयी भाजपने असा आभार मेळावा काल (ता.१२) घेतला.पिंपरी चिंचवड महापालिकेत गतवेळी २०१७ ला राष्ट्रवादीची १५ वर्षाची सत्ता घालवून प्रथमच भाजप सत्तेत आली. त्यांचे ७७ नगरसेवक निवडून आले. यावेळी, मात्र १०० नगरसेवक निवडून आणून पालिकेवर पुन्हा आपलाच झेंडा फडकवायचा निर्धार या विजयी मेळाव्यात भाजपच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला.दरम्यान, २०२२ मध्येच होणाऱ्या परंतू विविध कारणांमुळे आतापर्यंत वर्षभर रखडलेल्या या निवडणुकीत शंभर प्लसची घोषणा गतवर्षीच भाजपचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अगोदरच दिलेली आहे.शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा प्रभारी संतोष कलाटे, शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, महिला आघाडी शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.प्रत्येकजण मीच अश्विनी जगताप समजून प्रचार करत होता. पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी निवडणुकीची धुरा पेलली. त्यांनी लक्ष्मणभाऊंची कमी जाणवू दिली नाही. कुटुंबाचीही साथ मिळाली, असे आपल्या विजयाचे गणित अश्विनी जगतापांनी यावेळी मांडले. या पोटनिवडणुकीत रंगीत तालीम झाली.आता महापालिका निव़़डणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश त्यांनी दिला. तर,आपले काही हक्काचे मतदार बाहेर पडले असते, तर अश्विनी जगताप यांचा ५० हजाराच्या मताधिक्याने विजय झाला असता. त्यामुळे आता यापुढील प्रत्येक निवडणुकीत मतदार बाहेर काढायला हवा, असे सूचक वक्तव्य खा. बारणेंनी केले. आ.लांडगे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची उणीव जाणवू दिली नाही, अशी कृतज्ञता शंकर जगताप यांनी व्यक्त केली. खा.बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे यांनीही मोठी साथ दिली.

पण पोटनिवडणुकीची संधी साधून काही अल्पसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचे काम केले. दुःखाच्या प्रसंगात परकीयांसोबत स्वकीयांनीही आमच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अशी पाळी शत्रूवरही येऊ नये, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विघ्नसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे आमचे कुटुंब एक आणि घट्ट झाले. त्यामुळे त्या विघ्नसंतुष्ट लोकांचेही मी आभार मानतो, असा टोला त्यांनी लगावला.

 शंकर जगताप नेमकं काय म्हणाले?

‘लक्ष्मण जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हायला हवी होती. पण तसं घडलं नाही. या दरम्यान काही असंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्यास सुरुवात केली. भाऊ जाऊन जेमतेम पंधरा दिवस झाल्यानंतर असं संकट आमच्यावर ओढावल्यानं तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं. त्याहून अधिक दुःख म्हणजे परकीयांसह स्वकीयांनी ही हल्ला केला. घरातल्यांनीच हा हल्ला केल्यानं जगताप कुटुंबियांच्या स्मरणात तो कायम राहणार आहे. अशी वेळ दुश्मनांच्या कुटुंबावर कधीच येऊ नये. मात्र असो, आपण कोणाची राजकीय इच्छा दाबून ठेऊ शकत नाही. पण ही इच्छा कधी प्रकट करायला हवी, हे प्रत्येकाला ज्ञात असायला हवं, तेवढी राजकीय इच्छाशक्ती प्रत्येकात असायला हवी. परंतु त्याच विघ्नसंतुष्ठ व्यक्तींनी जगताप कुटुंबीय फोडण्याचं काम केलं. त्या सर्वांचे मी आजच्या या आभार मेळाव्यात ‘आभार’ मानतो. कारण त्यांनी कुटुंब फोडण्यासाठी जितके प्रयत्न केले, आम्ही तितकेच एक होत गेलो. आत्तापर्यंत भाऊ एकटेच कार्य करत होते. आता मात्र मी आणि वहिनी असे दोघे मिळून जनता आणि कार्यकर्त्यांसाठी कटिबद्ध असू. भाऊंचे अपूर्ण स्वप्न आम्ही दोघे मिळून सत्यात उतरवू अशी ग्वाही देतो, असं शेवटी शंकर जगतापांनी आवर्जून नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here